Monday, 16 April 2018

युद्ध

                               

युद्ध म्हणजे काय? दोन राष्टांमधील,समाजामधील, टोळ्यांमध्ये झालेली लढाई जी शस्त्रांनिशी लढली जाते. ही फार ढोबळ मानाने केलेली व्याख्या आहे. जगाच्या सुरुवातीपासूनच ही लढाई सुरू आहे. फक्त देश किंवा माणसे एकमेकांशी लढतात असे नाही तर श्वापदे किंवा जनावरे सुद्धा एकमेकांशी लढत असतात. गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये जेंव्हा युद्ध होते त्याला टोळीयुद्ध म्हणतात.
युद्ध हे अनेक प्रकारे अणि पद्धतीने लढले जाते. शारीरिक जसे पूर्वी कुस्तीसारखे मल्लयुद्ध लढले जायचे ज्यात शस्त्रांचा वापर नसे फक्त शारिरीक सामर्थ्यावर लढाई होत असे. त्यात सुद्धा अनेक डावपेच आणि अचाट शारीरिक सामर्थ्य आवश्यक असते. पण हे दोन व्यक्ति पुरतेच मर्यादित असे. बाकी पूर्वीच्या काळी भाले तलवारी गदा धनुष्यबाण अशी अनेक शस्त्रे वापरून दोन देशांच्या किंवा साम्राज्यांच्या मध्ये युद्ध व्हायची. टोळी युद्धात तर पूर्वी तलवारी हॉकीस्टिक सोडावॉटरच्या बाटल्या टय़ूबलाईट इत्यादी वाटेलते वापरले जायचे.
हळु हळू तलवारी भाले गेले अणि त्यांची जागा बंदुकीने पिस्तुलीने घेतली. जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली आणि नवनवीन शोध लागत गेले तसे या शस्त्रांमध्येही फार मोठे परिवर्तन होत गेले त्यांची संहारक शक्ति प्रचंड प्रमाणात वाढत गेली. लढाऊ विमाने, मिसाईल रॉकेट लाँचर्स अणि सगळ्यात भयानक  म्हणजे अणुबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब जे समस्त सृष्टीचा झटक्यात नाश करू शकतील यांची निर्मिती झाली. थोडक्यात पूर्वी अनेक दिवस चालू शकणारे युद्ध आता काही मिनिटात संपू शकते.
युद्ध म्हणजे अपरिमित हानी प्रचंड संहार बर्‍याच वेळा अमानुषपणाचा कळस. युद्ध म्हणजे प्रचंड मनुष्यहानी आर्थिक हानी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान. सर्वांत महत्वाचे म्हणजे प्रजेच्या मनावर झालेले आघात आणि ह्यातच द्वेषाची अणि पर्यायाने पुढच्या युद्धाची बीजे पेरली जातात. जेंव्हा युद्ध संपते तेव्हा जय विजय महत्वाचा रहात नाही कारण उरले असतात फक्त डोळ्यातील अश्रू सर्वत्र असलेली मृत्यूची चाहूल आसमंतात दाटलेली खिन्नता. परत घर उभे करण्याची चिंता. तेही होऊ शकते पण गेलेली माणसे परत येऊ शकत नाहीत आणि जे अपंग किंवा अधू होतात त्यांना मरण बरे असे वाटते.
मुळात युद्ध का होते?
याची बरीच कारणे आहेत. आज जसे अनेक देश आहेत तशी पूर्वी अनेक राज्ये होती. आपल्या राज्याच्या विस्तारासाठी दुसर्‍या राज्यावर आक्रमणे केली जात ते सरळपणे शरण आले तर बरे नाहीतर लढाईला पर्याय नसे. एखाद्या राज्यात अत्याचार होत असतील तर त्या राज्यातील प्रजेला त्यातून मुक्त करण्यासाठी युद्ध व्हायची. पण मुळात विस्तारवादी प्रवृत्ती अती महत्वाकांक्षी पणा स्वतःच्या ताकदीचा अहंकार ही फार महत्वाची कारणे आहेत उदा. अलेक्झांडर जो अख्खे जग जिंकायला निघाला होता. त्याचबरोबर शेजारच्या राज्यातील खजिना लुटण्यासाठी तेथील नागरिकांना गुलाम बनवण्यासाठी अणि स्त्रियांना दासी बनवण्यासाठी युद्ध व्हायची. पण सर्वात घातक म्हणजे धर्माच्या नावाखाली केलेली युद्धे. स्वतःच्या धर्माचा प्रसार करण्यासाठी केलेली युद्धे. ह्यात दोन प्रकारे युद्ध केले जाते एक म्हणजे मानसिक ज्यात अख्ख्या समाजाला धार्मिक भावना भडकावून चिथावले जाते अणि उरले सुरले काम शस्त्रांनिशी केले जाते. हे युद्ध वर्षानुवर्ष चालत रहाते कारण ह्याचा पुढचा टप्पा असतो धर्मांतराचा. हे काम साम दाम दंड भेद वापरून केले जाते. पण मला कधी कधी असे वाटते की पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धर्माचा वापर आपल्या फायद्यासाठी अत्यंत हुशारीने आणि बेमालूम पणे केला आहे. धर्माच्या नावाने लोकांना भडकावयाचे दुसर्‍या धर्माच्या लोकांवर अनन्वित अत्याचार करायचे जबरदस्तीने धर्मांतरे करायची अणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा. धर्म हा माणसाचा फार मोठा वीक पॉईंट आहे हे त्यांना चांगले ठाऊक होते  म्हणून त्यालाच यांनी शस्त्र बनवले ज्याची धार या जगाच्या अंतापर्यंत जाणार नाही. याची झळ आजही आपण भोगत आहोत.
आजही अख्खे जग धर्माच्या नावाखाली विभागले आहे. जगावर राज्य करण्याची इच्छा आजही गेली नाही. विस्तारवादी प्रवृत्ती आजही आहेत किंवा त्या वाढत आहेत त्यालाच आज सुपरपॉवर असे म्हणतात आपण अणि बाकी सर्वानी आपल्या दंडुक्याखाली रहावे ही यांची इच्छा. यांच्या संघर्षांत अख्ख्या जगाचे विभाजन झाले आहे. हम करे सो कायदा ही यांची वृत्ती. पण आता हे युद्ध मर्यादित स्वरुपात राहिले नाही. आर्थिक धार्मिक सामाजिक अणि अर्थात विनाशकारी शस्त्रांनी हे लढले जात आहे अणि रोज लढले जात आहे. ज्यांची इच्छा नसेल त्यांच्यावरही लादले जात आहे. पूर्वी एका दादाच्या खाली अनेक जण काम करत तसे आता एका सुपरपॉवरच्या खाली दहा देश असतात. यांच्या स्वार्थासाठी अणि राजकीय महत्वाकांक्षेपायी जगाची समीकरणे रोज बदलत असतात. खरतर हे सर्व आपले खोटे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होत असलेली केविलवाणी धडपड आहे. खोटे अस्तित्व अशासाठी म्हटले की जो खरा असतो तो कणखर असतो त्याला स्वतः च्या अस्तित्वाची भीती वाटत नाही. पण आज जगात जे काही चालले आहे ते फक्त स्वार्थासाठी अणि भीती पोटी चालले आहे. भीती आहे ती स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची. त्यासाठी कधी आर्थिक लालूच दाखवायचे कधी धर्माचे पांघरूण पांघरायचे तर कधी छोटे युद्ध करायचे.
आज एक फार गंमतीची गोष्ट घडली आहे किंवा घडत आहे. ज्या देशाने काही वर्षांपूर्वी अणुबॉम्बचा वापर केला तो देश आजही अण्वस्त्रधारी आहे आणि इतर देशांना अण्वस्त्रधारी होण्यापासून रोखत आहे. अर्थात हे जे सुपरपॉवर देश आहेत ते सर्व असेच आहेत स्वतः राक्षसी ताकद मिळवली पण दुसर्‍याला त्यापासून रोखायचे हे सुद्धा भीती पायी चालले आहे कारण मुळात अण्वस्त्रांची ताकदच अशी आहे की बसल्या जागी माणूस जगाचा विनाश करू शकतो. हे सर्व माहिती असूनही आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत.
खरतर जगाने महाविध्वंसक अशी दोन महायुद्धे बघितली आहेत अणुबॉम्बचे दुष्परिणाम अनुभवले आहेत इतर अनेक युद्धे गेल्या साठ सत्तर वर्षांत बघितली आहेत तरी सुद्धा जगातील या सर्व महान नेत्यांच्या विस्तारवादी धोरणापायी राक्षसी महत्वाकांक्षेपायी अख्खे जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आणि त्याचे परिणाम जगातील ९५%  सामान्य जनता भोगत आहे. धर्माच्या नावाखाली पेटलेल्या अग्निकुंडात होरपळून निघत आहे आणि मूकपणे सहन करत आहे. ही चूक कोणाची त्या मूठभर नेत्यांची की सहन करणार्‍या ९५% जनतेची? स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या माणसाची बुद्धी कुठे गहाण पडली आहे कुणास ठाऊक.
खरतर सामान्य माणसाचे युद्ध त्याची लढाई रोज स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेली असते. त्याला नको असते बंदूक की नको असतो अणुबॉम्ब त्याला हव असत एक छान घर आणि त्या घरातील माणसे पण जगात सामान्य असणे हा फार मोठा गुन्हा झाला आहे. जगण्याच्या लढाईत आपण रोजच युद्ध करत आहोत. पण खर युद्ध हे आपले आपल्या स्वतः बरोबर आहे. आपल्यातील दानवाला मारा आपल्या स्वार्थी प्रवृत्तीशी लढाई करा आपले दोष ओळखून त्यांच्यावर विजय प्राप्त करा. हे जर मानवाला शक्य झाले तर जगात अणुबॉम्ब काय पण धर्माची सुद्धा गरज उरणार नाही.

No comments:

Post a Comment