Thursday, 14 September 2017

डंकर्क - ख्रिस्तोफर नोलन

Facebook/Swapnilpatil
कोणत्याहीइतिहासातल्या काही घटना जनमानसात रुतून बसतात. मिथक होण्याएवढी गुंतागुंत अशा घटनांत बऱ्याचदा आढळते. ‘सुष्टा-दुष्टांमधल्या संघर्षात एकाचा विजय’, असं त्यांचं सुस्पष्ट अर्थनिर्णयन सहसा शक्य नसतं. त्यामुळेच, कादंबरीतून किंवा चित्रपटाद्वारे त्यातलं नाट्य नव्यानं लोकांसमोर आणण्याचं आव्हान भल्याभल्यांना भुरळ घालतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश फौजेची डंकर्कमधून माघार ही तशी एक घटना आहे. हिटलरच्या सेनेनं युरोपवर आक्रमण केल्यानंतर युरोपच्या बचावासाठी ब्रिटिश फौज तिथे गेली. मात्र, जर्मन सेनेच्या झंझावातापुढे तिचं काही चाललं नाही. जमिनीवर कोंडी झालेल्या फौजेला डंकर्कच्या समुद्रकिनाऱ्यावर एकत्र आणून समुद्रमार्गे परत आणण्याचं ठरलं. किनाऱ्यावर गोळा झालेल्या सैनिकांना जर्मन विमानहल्ल्यांना तोंड द्यावं लागलं. हजारो सैनिक त्यात दगावले, पण २७ मे ते ४ जून १९४० दरम्यान तब्बल ३ लाख सैनिक ब्रिटनमध्ये परतले. पंतप्रधान चर्चिल यांनी तेव्हा ह्या घटनेचं वर्णन ‘महाकाय अरिष्ट’ असं केलं होतं. आज ह्या घटनेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन प्रचलित आहेत. अर्थात, नाझी भस्मासुरापुढे हतबल झालेल्या फ्रेंचांच्या दृष्टीनं डंकर्कची माघार म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला लांडग्यांच्या तोंडी देऊन काढलेला पळ होता. त्याउलट, ब्रिटिश फौजा तेव्हा बचावल्या म्हणूनच महायुद्धात अखेरपर्यंत एकटा ब्रिटन स्वतंत्र राहून लढू शकला आणि अखेर हिटलरचा पाडाव शक्य झाला, असं एक राष्ट्राभिमानी मिथक ब्रिटनमध्ये प्रचलित आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात सापडतो तेव्हा तेव्हा त्या मिथकाचा वापर राष्ट्रज्योत जागवण्यासाठी केला जातो. 

No comments:

Post a Comment